Ad will apear here
Next
गुलबर्ग्याची सफर
गुलबर्गा किल्ला

‘करू या देशाटन’
या सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांबद्दल माहिती घेतो आहोत. आजच्या भागात सफर करू या गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची...
......
गुलबर्गाचे नाव पूर्वी ‘कलबुर्गी’ असे होते. त्या कन्नड शब्दाचा अर्थ खडकाळ जमीन असा आहे. सध्या पुन्हा एकदा ‘कलबुर्गी’ हेच नाव रूढ झाले आहे. या भागात मौर्य राजवटीचे अस्तित्व दाखविणारे शिलालेख सापडले आहेत; मात्र गुलबर्ग्याचा सहाव्या शतकापासूनचा इतिहास उपलब्ध आहे. चालुक्यांच्या ताब्यात असलेल्या या भागावर १०व्या शतकापर्यंत राष्ट्रकूटांचे नियंत्रण होते. परंतु चालुक्यांनी अल्प कालावधीत पुन्हा ताबा मिळवला आणि २०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. १२व्या शतकापर्यंत त्यांचे राज्य होते. त्यानंतर देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्रांच्या होयसळांनी कल्याणीचे चालुक्य आणि कालचुरी यांचे वर्चस्व नष्ट केले. याच कालखंडात वारंगळचे काकतीय राजे प्रबळ झाले आणि सध्याचा गुलबर्गा आणि रायचूर जिल्हा मिळून त्यांच्या राज्याचा एक भाग बनला. 

सन १३२१मध्ये दिल्लीच्या सुलतानांनी यावर कब्जा केला; मात्र हसन गंगू या सरदाराने बंड केले व वेगळी चूल मांडली. पर्शियन इतिहासकार फरिश्ता याच्या मते हसन हा सामान्य अफगाण असून, दिल्लीत राहत होता आणि गंगू नावाच्या एका ब्राह्मणाची जमीन तो कसायचा. ही जमीन नांगरताना हसनला खजिना सापडला आणि तो त्याने आपल्या जमीनमालकाच्या स्वाधीन केला. गंगू ज्योतिषी हसनच्या या प्रामाणिकपणावर खूश झाला व त्याने आपले दिल्लीच्या राजदरबारातील वजन वापरून त्याची बादशहाकडे शिफारस केली आणि त्याला बादशहाच्या सेवेत दाखल केले. तेथे एक एक पायरी वर चढत हसन लवकरच दिल्लीच्या बादशहाचा दख्खनमधील सरदार बनला. इ. स. १३४६मध्ये दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. हसनने आपल्या घराण्याला आपल्या उपकारकर्त्याचे नाव दिले आणि पुढील १५० वर्षे दख्खनच्या प्रांतावर सत्ता गाजविली आणि बहामनी (ब्राह्मणीचा अपभ्रंश) घराणे उदयास आले. 

गुलबर्गा ही बहामनी घराण्याची पहिली राजधानी ठरली. १५२७मध्ये बहामनी राजवट संपुष्टात येऊन पाच स्वतंत्र राजवटी विजापूर, बिदर, बेरार, अहमदनगर आणि गोवळकोंडा येथे स्थापन झाल्या. हा भाग बिदर आणि विजापूर या राजवटींमध्ये विभागला गेला व त्याचे अस्तित्व संपले. तरीही बहामनी राजवटीच्या खाणाखुणा मात्र आजही दिसून येतात. 

गुलबर्गा हे घुमटांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. गुलबर्गा किल्ल्याचे मूळ बांधकाम काकतीय राजा गुलचंद याने केले होते. बहामनी राज्य स्थापनेनंतर पश्चिम आशियाई व युरोपीय सैन्य वास्तुशास्त्रीय शैलीमध्ये बहामनी राजवंशाचा शासक अलाउद्दीन हसन बहमान शाह याने किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्ला पाच एकर जमिनीवर असून, तीन किलोमीटर लांबीची दुहेरी तटबंदी किल्ल्याला आहे. तसेच किल्ल्याभोवती खंदक आहे. किल्ल्याला १५ बुरुज असून, त्यावर आठ मीटर लांबीच्या तोफा आहेत. 

बारा गझी तोफ

जगातील सर्वांत लांब तोफ :
पंचधातूची बारा गझी तोफ ही जगातील सर्वांत लांब तोफ असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. मोहम्मद अयाजुद्दीन पटेल (राष्ट्रीय पुरस्कार विजेता, कलाकार), छायाचित्रकार डॉ. रेहमान पटेल (इंडो-इस्लामिक आर्ट, कलबुर्गी येथील कलाकार, संशोधक) आणि मोहम्मद इस्माइल (बहामनी काळावरील संशोधक आणि नाणी संग्राहक) या संशोधकांचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत रशियातील १७.५ फूट लांबीची तोफ जगातील सर्वांत मोठी तोफ समजली जात होती. जयपूर तोफ सुमारे ५० टन वजनाची आहे. मोहम्मद अयाजुद्दीन पटेल यांच्या मते कलबुर्गी येथील बारा गझी तोफेचे वजन सुमारे ७० ते ७५ टन असू शकते. जयपूर तोफेची गोळीबार क्षमता ३५ किलोमीटरपर्यंत आहे, तर बारा गझी तोफेची क्षमता ५०-५५ किलोमीटरपर्यंत असू शकते. 

जामा मशीद

जामा मशीद :
गुलबर्गा किल्ल्यात बहामनी राज्यस्थापनेच्या समरणार्थ ही मशीद सन १३६७मध्ये बांधण्यात आली. ही मशीद २१६फूट (६६ मीटर) लांब आणि १७६फूट (५४ मीटर) रुंद आहे. भारतातील मोठ्या मशिदींपैकी ही एक समजली जाते. स्पेन मधील कॉर्डोबच्या ग्रेट मशिदीसारखीच हिची रचना आहे. प्रार्थनागृहात दक्षिणोत्तर १० कॉरिडॉर आहेत, तर पूर्व-पश्चिम सात कॉरीडॉर आहेत. मशिदीवर पाच मोठे घुमट (डोम्स) (एक मोठा आणि कोपऱ्यात चार लहान) आणि २५० लहान कमानी आहेत. भव्यता हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. 

शरण बसवेश्वर मंदिर

शरण बसवेश्वर मंदिर :
१८व्या शतकात शरण बसवेश्वर हे लिंगायत स्वामी होऊन गेले. त्यांची येथे समाधी आहे. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर असून, सुस्थितीत आहे. 

बुद्धविहार : बुद्धविहार गुलबर्गा विद्यापीठाजवळ सेडम रोडवर जिल्हा मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. हा बुद्धविहार १८ एकरांवर विस्तारलेला असून, मुख्य इमारतीमध्ये तळघरात ध्यान केंद्र आणि तळमजल्यावर भगवान बुद्ध चैत्य (पाली मंदिर) आहे. बुद्धविहाराचा घुमट पारंपरिक बौद्ध स्थापत्यशास्त्रावर बांधलेला असून, तो ७० फूट उंच आणि ५९ फूट व्यासाचा आहे. मुख्य घुमट भव्य असून, संगमरवरी आहे. बुद्धविहारामध्ये सम्राट अशोक राजाच्या सन्मानार्थ ४८ फूट उंचीचा अशोकस्तंभ बांधलेला आहे. प्रार्थनागृह १५ हजार ६२५ चौरस फूट असून, त्याला १७० खांब आहेत. त्याला २८४ ब्लॉक्स असून, प्रत्येक ब्लॉकमध्ये अजंठा, एलोरा, नागपूर, बोधगया, सरनाथ, राजगीर, लुंबिनी, कुसिनारा, थायलंड, सिंगापूर, श्रीलंका, तिबेट, जपान आणि रोम येथील बुद्धमंदिरांची रचना दर्शविणारी मालिका आहे. येथे १०० फूट बाय १०० फूट आकाराचे खुले, २५०० आसन क्षमतेचे ओपन-एअर थिएटर आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यू-आकाराच्या धम्म कॉम्प्लेक्समध्ये डॉर्मिटरी, लायब्ररी, अभ्यास केंद्र, किचन, डायनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल, प्रदर्शन हॉल आणि अतिथींसाठी खोल्या आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली धम्म क्रांती यात्रा दर्शविणारा कांस्य पुतळा आहे.

ख्वाजा बंदा नवाज दरगाह

ख्वाजा बंदा नवाज दरगाह :
सईद मोहम्मद हुसेनी या सुफी संतांची कबर येथे आहे. ही सुंदर इमारत इंडो-इस्लामिक शैलीमध्ये बांधली गेली. भिंती आणि घुमटावरील चित्रे तुर्की आणि इराणी शैलीतील आहेत. इतिहास आणि साहित्यामधील उर्वरित विषयांवर उर्दू, फारसी आणि अरबी भाषेत दरगाह ग्रंथालयात सुमारे १० हजार पुस्तके आहेत. 

भीमा-अमरजा संगमस्थान

संगमावरील संगमेश्वर मंदिरासमोरील श्री स्वामींची नयनमनोहर मूर्तीगाणगापूर : हे दत्तसंप्रदायातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दत्त महाराजांचा दिव्य अवतार ‘श्री नृसिंह सरस्वती महाराज’ यांचे येथे २२ ते २३ वर्षे वास्तव्य होते. या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्थान (भीमा आणि अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, कल्लेश्वर या ठिकाणांचे भाविक दर्शन घेतात. 

संगमापासून वरच्या बाजूला जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. 


भस्माचा डोंगरभस्माचा डोंगर : या भागात अनेक ऋषी-मुनींनी तपसाधना केली होती. त्यामुळे या तपोभूमीतील ‘विभूती’ अनेक भाविक घरी घेऊन जातात. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतारसमाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे, असे मानले जाते. भीमा नदीमधून अवतारसमाप्तीचा प्रवास करताना स्वामी अचानक गुप्त झाले. त्यानंतर त्यांनी सर्व भक्तांना या पादुकास्थळी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. 

निर्गुण पादुका मठ, गाणगापूरनिर्गुण पादुकाश्री क्षेत्र गाणगापूरला आषाढ शुद्ध पौर्णिमेला (गुरुपौर्णिमेला) श्रीव्यासपूजा साजरी केली जाते. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्रीकल्लेश्वर मंदिरात जाते आणि रात्री आठ वाजता परत येते. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव आश्विन वद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या वेळेस महाप्रसाद वाटला जातो. 

कडगंची येथील दत्तमू्र्तीश्री क्षेत्र कडगंची : वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले. हे स्थान पूर्वी फारसे प्रसिद्ध नव्हते. हल्ली धकाधकीच्या जगात लोकांना मानसिक समाधान मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आता लोक अध्यात्माकडे वळत आहेत. अनेक जण गुरुचरित्र वाचतात. त्यामुळे हे ठिकाण लोकांना माहिती होत आहे आणि श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिद्धीला आले आहे. श्रीगुरूंचा कालावधी इ. स. १३७८ ते इ. स. १४५८ हा मानला जातो. श्रीगुरूंचे मुख्य सात संन्यासी शिष्य पुढीलप्रमाणे - बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती. 

मूळ गुरुचरित्र हस्तलिखितसंसार करूनही श्रीगुरूंना निरंतर समर्पण भावाने पूजणारे अनेक संसारीजन श्रीगुरूंचे शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरूंचे अंतरंग शिष्य होते श्री. सायंदेव साखरे, अर्थात श्रीगुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापरपणजोबा. त्याचे गाव कडगंची. सायंदेवाच्या घराच्या जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानाचे मोठे बांधकाम चालू आहे. श्री सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आणि येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती अतिशय सुंदर आहे. हे तीर्थक्षेत्र गाणगापूरपासून ३४ किलोमीटर अंतरावर आहे. 

शहाबाद : शहाबादी फरशी भारतात सर्वत्र स्वस्त म्हणून ओळखली जाते. कृषी, चुनखडीच्या खाणी, बॉयलर आणि सिमेंटचे उत्पादन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. 

विभूतिहळ्ळी

विभूतिहळ्ळी :
महत्त्वपूर्ण मेगालिथिक कालावधीशी संबंधित पुरातत्त्वीय स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सन १८५०च्या सुमारास ब्रिटिश अधिकारी कर्नल फिलिप मेडो टेलर या हैदराबादच्या अधिकाऱ्याने गुलबर्गा भागात लोकहिताची कामे केली होती. स्थानिक लोक त्याला महादेवबाबा म्हणत होते. याच अधिकाऱ्याला विभूतिहळ्ळी भागात अश्मयुगीन संदर्भ मिळाले. एका ओळीत असणारे ५०० बोल्डर्स त्याला सापडले. गुलबर्गा येथे टेलरने महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय शोध घेतले आणि रॉयल आयरिश अकादमीच्या ‘ट्रान्झॅक्शन ऑफ दी रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या ‘जर्नल ऑफ दी बॉम्बे ब्रँच’मध्ये त्याने आपले निष्कर्ष प्रकाशित केले. 

वाडी जंक्शन : रेल्वेचे दक्षिण भारतातील हे महत्त्वाचे जंक्शन आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांतील गाड्या या स्थानकातून जातात. वाडी लाइमस्टोन खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सिमेंट उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. एसीसी कंपनीची मोठी सिमेंट फॅक्टरी येथे आहे. गुलबर्ग्यापासून ३७ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. 

मालखेड किल्ला

मालखेड :
येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे. ही पूर्वी राष्ट्रकूट राजांची राजधानी होती. हे जैन तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील नेमिनाथ मंदिर इ. स. ९००मधील आहे. तेथे २४ तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. तसेच पंचधातूच्या ९६ प्रतिमाही आहेत. जैन पंथातील प्रसिद्ध महापुराण (आदिपुराण आणि उत्तरपुराण) नवव्या शतकात आचार्य जिनासेना आणि त्यांचे शिष्य गुनाभद्र यांनी येथे लिहिले. शंकराचार्य माधवाचार्य यांचा येथे एक मठही आहे. गुलबर्ग्यापासून हे ठिकाण ४० किलोमीटरवर आहे.

जैन मंदिर, मालखेड

नारायणपूर :
हे कृष्णा नदीवरील १० किलोमीटर लांबीचे, ९५ फूट उंचीचे आणि ३२ टीएमसी क्षमतेचे धरण आहे. 

सन्नती : हे भीमा नदीच्या काठावरील कर्नाटकातील सर्वांत मोठे बौद्धकालीन ठिकाण आहे. येथील रानमंदल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक मैदानावर शिलालेख, टेराकोटा भांडी, शस्त्रास्त्रे सापडली आहेत. पुरातत्त्व खात्यामार्फत येथे उत्खनन चालूं आहे. गुलबर्ग्यापासून ९० किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

गुलबर्ग्याला कसे जाल, कोठे राहाल?
गुलबर्गा हे रेल्वेने, रस्त्याने मुंबई, हैदराबादला जोडलेले आहे. तसेच जवळचा विमानतळ महाराष्ट्रात लातूर (१२६ किलोमीटर) आणि हैदराबाद (१६९ किलोमीटर) येथे. गुलबर्ग्याला जाण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी आहे. जेवण व राहण्याची उत्तम सोय गुलबर्गा येथे होऊ शकते. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZZPBW
Similar Posts
कर्नाटकचा रमणीय किनारी प्रदेश ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण शिमोगाची सैर केली. आजच्या भागात माहिती घेऊ या कर्नाटकच्या किनारी भागातील पर्यटनस्थळांची....
निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा कर्नाटकात पर्यटनासाठी जायचं म्हटलं, तर बेंगळुरू किंवा म्हैसूर या दोन ठिकाणांची नावं पटकन कोणाच्याही तोंडात येतात; पण त्यापलीकडेही कर्नाटकात बरंच काही पाहण्यासारखं आहे. म्हणूनच ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण फिरणार आहोत कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी...
चालुक्यांची राजधानी - बदामी एके काळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी. ‘करू या देशाटन’ सदरात आज सैर करू या त्याच ठिकाणाची...
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language